About Us

“स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार: प्रशमनं च।”

म्हणजेच स्वस्थ व्यक्तिच्या स्वास्थ्याचे रक्षण करा, तसेच जो व्यक्ती व्याधीने पीडित असेल त्याच्या व्याधीची चिकित्सा करा असा हेतू आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचे वैद्यकीय शास्त्र असलेल्या आयुर्वेदाचा आहे. सुमारे ५००० वर्षांपूर्वी पासून भारतीय उपखंडातील या आयुर्वेदने काही मूलभूत तत्व व सिद्धांतांच्या आधारावर केवळ अनेकविध व्याधींची चिकित्साच नव्हे तर माणसांसाठी आरोग्यपूर्ण जीवनशैलीची रचना केली. त्यापुढे काळानुरूप विविध शास्त्रकारांनी त्यामधे संशोधन करत भर घातली.

हे वैद्यकीय ज्ञान ब्रह्मदेवापासून उदयास आलेले असून, याची रचना भारतीय परंपरा, जीवनशैली तसेच भौगोलिक दृष्टीने विचार करून केलेली आहे. आज हे शास्त्र सर्व जगभरात पसरलेले आहे. विविध पाश्चात्य वैद्यकीय शास्त्रांद्वारे ज्या पुराण व्याधींची चिकित्सा होऊ शकत नाही त्या व्याधींपासून सुटका मिळविण्यासाठी लोकं आज आयुर्वेदाकडे वळत आहेत.

याच आयुर्वेदीक शास्त्राची मूलाधार ओळख सर्वसामन्यांना व्हावी व आयुर्वेद चिकित्सा पद्धतीकडे जनतेचा कल वाढावा या दृष्टीने केलेला हा एक छोटासा खटाटोप. आयुर्वेदा बद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करणे आणि शास्त्रशुद्ध व अचूक असे आयुर्वेदिक ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविणे असा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करू इच्छितो. प्रत्येक व्यक्तीने आयुर्वेदाकडे केवळ एक चिकित्साशास्त्र म्हणून न पाहता एक निरोगी आयुष्य जीवनपद्धती म्हणून बघावे. आयुर्वेदात उपदेश केलेल्या दिनचर्या व ऋतुचर्येचे पालन, सदाचाराचे आचरण, वर्ज्य गोष्टींचा त्याग व जीवनोपयोगी नियम आत्मसात करणे हे सर्व लोकांनी करावे यासाठी आम्ही हा प्रयोग केलेला आहे.

Spread the love